सचिन सखाराम पिळणकर (आमचे सर)

सचिन सखाराम पिळणकर

१९९३ पासून मी कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये काम करीत आहे. साधा डेटाएंट्री ऑपरेटर पासून सुरवात करीत करीत असताना एकाच प्रोग्रॅममध्ये काम करता-करता आज पर्यंत कॉम्प्युटरमधीलअनेक सॉफ्टवेअर शिकलो. तुमचा विश्वास बसणार नाही पण मी सर्व सॉफ्टवेअर्स स्वतःच (एकट्याने) शिकलो. कुणी शिकविणारे पण नव्हते. ऑफिसमध्ये संध्याकाळी सर्व लोक घरी गेल्यावर मी एकटाच ऑफिसमध्ये बसून एकट्याने अनेक सॉफ्टवेअर्स शिकले. कुणी विचारल्यास काम भरपूर आहे. उद्या साहेबांना द्यायचे आहे असे सांगून दररोज संध्याकाळी २ तास जास्त वेळ थांबून हळूहळू शिकायला सुरुवात केली.
आज अनेक सॉफ्टवेअर्स चांगल्याप्रकारे वापरता येतात. थोड्याफार गोष्टी वगळल्यास कॉम्प्युटरवर जवळ-जवळ सर्वच कामे करता येतात. मला ओळखणार्‍या सर्वांनाच आता हे माहीत आहे, की कॉम्प्युटरवर काम करताना कुठलाही प्रॉब्लेम असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही सचिन आहे ना! 
पूर्वीपासूनच शिकविण्याची आवड असल्याने सतत इतरांना काहीतरी सांगत राहायचे व आपले ज्ञान वाटत राहायचे हेच करत आलो. जेव्हा कशात काही नव्हतो, इतकेच की घरी कॉम्प्युटरदेखीलनव्हता तेव्हा एकदा पंधरावीच्या क्लासमध्ये सरांनी विचारले की मोठे होवून तुम्ही काय करणार, तेव्हा कमी पैशांमध्ये कॉम्प्युटर शिकविणारा मला एक मोठी कॉम्प्युटरची इंस्टिट्युट सुरू करायची आहे असे सांगितले आणि त्यावर क्लासमधील सर्व मुले हसल्याचे अजून चांगले लक्षात आहे. पणत्यावेळेस त्या मित्रांचा मला मुळीच राग आला नव्हता, कारण ते स्वाभाविक होते.
वडिलांनी रिटायर्ड झाल्यावर मिळालेल्या पैशांमध्ये माझ्यासाठी एक चांगला कॉम्प्युटर घरीघेऊन दिला. आजच्या माझ्या यशाची ती पहिली पायरी होती. घरची परिस्थिती एकदमहलाखीची नसली तरी त्या काळामध्ये साठ हजार रुपये छोटी रक्कम नव्हती. आपल्या तिन्हीमुलांसाठी वडिलांनी त्यांना मिळालेले पैसे संपविले. आता त्यांच्याजवळ काहीच नव्हते. म्हणूनचबहुधा मला त्या पैशांची किंमत कळली होती व रात्री उशीरापर्यंत काम करून मेहनत घेण्याची सवय लागली.
त्याकाळामध्ये वडिलांकडे अजून थोडे पैसे असते तर एखादा मोठा कोर्स करून आज अमेरिकेमध्येचांगल्या पगाराची नोकरी करत असतो असे कधीकधी वाटते, पण दुसर्‍याच क्षणाला असेही लक्षात येते की तसे काही झाले नसते, कारण जर मी खरंच एवढा हुशार असतो तर पंधरावी पास व्हायला ११ वेळा परीक्षा द्यायची गरज पडली नसती. शिक्षण फार आवश्यक असते हे यातून सांगायचे होते. माझ्या मित्रांचा तर असा ठाम विश्वास आहे की मुंबई युनिव्हर्सिटीने शेवटी कंटाळून पास केले असेल. पण नशीब युनिव्हर्सिटी कुणालाही नावाने ओळखत नाही. दरवर्षी प्रत्येकास नवीनक्रमांक असतो. म्हणून स्वतःच्या मेहनतीने पास झालो असे मलाही वाटते.
लहानपणापासून कुठल्याच क्षेत्रामध्येच चांगला नव्हतो. चित्रकला लहानपणी चांगली येत होती पण लहानपणी सर्वांचीच चित्रकला चांगली असते. अभ्यासाची जास्त गोडी नसल्याने दरवर्षी मार्क वाढवून पास व्हायचो. चौथीनंतर वर्गामध्ये वार्षिक परीक्षेमध्ये नंबर कधी आलाच नाही. त्यामुळेशाळेमध्ये आलो काय की नाही आलो काय कुणालाच काही फरक पडत नसे. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ते म्हणजे अभ्यासामध्ये जरी हुशार नसलो तरी शाळेतील माझे सर्व शिक्षक मात्र मला फार चांगले मिळाले. अभ्यासजरी डोक्यात बसत नसला तरी त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून झालेल्या संस्कारांची परिणिती आज माझ्या बोलण्यात आणि वागण्यातून दिसून येते. नाहीतर एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलायचे आणि वागायचे इतर कुणाकडून शिकलो असतो.
माझ्या हुशार होण्यामागे माझ्या ऑफिसमधील म्हणजेच हिंदू विवेक केंद्रातील माझ्या साहेबांचा आणि वरिष्ठांचा देखिल हातभार आहे. 'एखादी गोष्ट होत नाही असे बोलायचे नाही मी करूनदाखवू का?' या एका वाक्याने मी कुठलेही काम करायला शिकलो. आज हे ऐकायला फार बरे वाटते की 'सचिनला विचार तो करून देईल'. ऑफसमध्ये फक्त ऑफसचीच काम नाही तर इतरही अनेक कामे करायला शिकलो. म्हणूनच ऑफिसमध्ये काय काम करतोस असे कुणी विचारल्यावर मी 'ऑलराऊंडर' असे उत्तर देतो.
आज देखिल कॉम्प्युटरवर काम करताना दररोज कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. महाभारतातील शकुनीला ज्याप्रमाणे खेळातील फासे चांगले चालविता येत होते त्याप्रमा़णे आता मला कॉम्प्युटर चांगला कळतो. मुळात कुठलीही गोष्ट करता येते हेच मी लक्षात ठेवून सुरुवात करतो.
एखादी गोष्ट माहीत नाही तर ते सांगण्यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. नाही माहीत तर नाही माहीत! त्यात काही विशेष नाही. एखादी गोष्ट माहीत नसणे याचा अर्थ त्या व्यक्तीलाकाहीच माहीत नाही असा होत नाही. 'नाही माहीत' असे त्या-त्या ठिकाणी बोलल्यानेच बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या.

 

काही उपयोगी लेख

प्रगतीचीवाटचाल.कॉम चे सर्व हक्क राखीव आहेत – निखिल संतोष महाडेश्वर